नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कृषी कायद्याविरोधात तीन आठवड्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना अहिंसक आंदोलनाचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याचा सल्ला केंद्राला दिला. मात्र, तसं केल्यास शेतकरी चर्चेस तयार होणार नसल्याचे नमूद करत केंद्र सरकारने हा सल्ला अमान्य केला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र ट्विट केलं असून शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना काल गुरुवारी एक ८ पानी पत्र लिहिल आहे. यात त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना कृषी कायदे त्यांच्यासाठी कसे फायद्याचे आहेत हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे हे पत्र वाचण्याचे आव्हान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नव्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी पत्र लिहिलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, पियूष गोयल, निर्मला सीतारमन तसंच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नरेंद्र तोमर यांच्याकडून हे पत्र प्रसिद्द करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र तोमर यांचं हे पत्र ट्विट केलं असून शेतकऱ्यांना ते वाचण्याचं आवाहन केलं आहे. “कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी बंधू भगिणींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नम्रपणे संवाद साधण्याचा एक प्रयत्न केला आहे. सर्व अन्नदात्यांनी हे पत्र वाचावं असा माझा आग्रह आहे. देशवासीयांना आग्रह आहे की, हे पत्र त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं,” असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पत्रामध्ये केंद्र सरकारने आपण शेतकऱ्यांसोबत खुलेपणाने चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. पण सोबतच विरोधकांच्या अजेंड्याचं मनोरंजन करणार नाही यावरही जोर दिला आहे. विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करताना सरकारने म्हटलं आहे की, “गेल्या २० ते २५ वर्षात कोणत्याही शेतकरी नेता किंवा संघटनेचं वक्तव्य दाखवा ज्यांनी शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळाला पाहिजे असं म्हटलं आहे”.
प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो अशी सुरुवात असणारे या पत्रात कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भावनिक साद घातली आहे. त्यांनी आपणही शेतकरी कुटुंबातूनच वाढल्याचा हवाला देत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यांनी म्हटले की, देशातील वेगवेगळ्या भागातून असा शेतकऱ्यांची उदाहरणे समोर येत आहेत ज्यांना नव्या कृषी कायद्याचा फायदा होत आहे. मी सुद्धा शेतकरी कुटुंबातील आहे. शेतीतल्या लहान लहान गोष्टी आणि त्यातली आव्हाने दोन्ही पहात, समजतच लहानाचा मोठा झालो आहे. शेताला पाणी देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जाग राहणं, पाणी सुरू असताना अनेक अडचणी येतात, अवेळी पावसाचा मारा, वेळेवर पडलेल्या पावसामुळे होणारा आनंद या सर्व गोष्टी माझ्याही आयुष्याचा भाग होत्या. पीक कापल्यानंतर त्याची विक्री होण्यासाठी मी सुद्धा वाट पाहिली होती.