रांची (वृत्तसंस्था) झारखंडमध्ये आयएएस अधिकारी पूजा सिंघल ईडीच्या रडारवर आहेत. झारखंडमध्ये खाण घोटाळाप्रकरणी ईडीने मोठी कारवाई करीत आयएएस अधिकारी आणि खाण, भूविज्ञान विभागाच्या सचिव पूजा सिंघल व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांवर शुक्रवारी धाडी घातल्या. पूजा सिंघल यांच्याकडे जवळपास १७ कोटींपेक्षा अधिक नगद सापडल्याची माहिती आहे.
झारखंडच्या रांची, खुंटी, राजस्थानच्या जयपूर, हरयाणाच्या फरिदाबाद व गुरुग्राममध्ये, प. बंगालच्या कोलकाता, बिहारच्या मुजफ्फरपूर व दिल्लीच्या एनसीआरमध्ये धाडी टाकल्या आहेत. पूजा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात.
कोण आहेत पूजा सिंघल ?
पूजा सिंघल या २००० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्या खुंटी जिल्ह्यात कार्य होत्या. त्या सध्या खाण व भूविज्ञान विभागाच्या सचिव व खनिज विकास महामंडळाच्या मुख्य संचालक आहेत. झारखंडमध्ये मनरेगात झालेल्या १८.०६ कोटींच्या घोटाळ्याच्या वेळी त्या खुंटी जिल्ह्यात जिल्हाधिकारी होत्या. तपासात ज्युनिअर इंजिनीयर राम विनोद प्रसाद सिन्हा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सिन्हा यांना १७ जून २०२० रोजी प. बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातून ईडीच्या टीमने अटक केली होती.