सातारा (वृत्तसंस्था) मी राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिला आहे. परंतु राज्याचं राजकारण नक्की कोणत्या वळणावर चाललंय, ते मलाच कळायचं बंद झालंय, अशी उपरोधिक टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले.
ते गुरुवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून लादण्यात आलेल्या कोरोना निर्बंधांविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांची बाजू उचलून धरली. मी व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ठणकावून सांगितले.
ते पुढे म्हणाले, देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
लॉकडाऊन शिथिल झालेच पाहिजे. लोकांना अन्न मिळाले नाही तर ते करणार काय? मी कधीही राजकारण केले नाही, पण जे चाललेय ते करमणुकीचा भाग झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत कोण काय भूमिका घेणार, तेच मी बघणार आहे, आ इशारा उदयनराजेंनी दिला. कोरोनाची साथ लगेच कमी होणार नाही. त्यासाठी लोकांनी व्यक्तिगत काळजी घ्यायला हवी.
सध्या वातावरणात अनेक व्हायरस आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला. राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. माणूस जगण्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.