मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाइल ताब्यात घेतला तो पून्हा तपास यंत्रणांना दिला नाही असा आरोप निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त समशेर पठाण यांनी केलाय. अशात कसाबचा जर मोबाइल सापडला असेल आणि तो जर मिळाला असता. तर अनेक गोष्टी समोर आल्या असत्या असे मत सरकारी वकिल उज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.
दहशतवादी कसाबच्या या मोबाइल प्रकरणाबाबत शमशेर पठाण यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं असून सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवला होता, अशी शंकाही व्यक्त केली आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता असं त्यांनी म्हटलं आहे.
परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी तक्रारीत केला आहे. याबाबत सरकारी वकिल उज्वल निकम यांना प्रश्न केला असता. कसाबचा मोबाइल मिळाला असता. तर अनेक गोष्टी समोर आल्या असत्या अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यास परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.