अकोला (वृत्तसंस्था) मद्यधुंद अवस्थेत आईच्या डोक्यात दगड टाकून तिला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापासोबत झालेल्या झटापटीत मुलाकडून वडिलांचा खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी कृषीनगरात घडली. किशोर विश्राम पाईकराव (वय ४०) असे मृतकाचे नाव आहे. तर जितेंद्रकुमार किशोर पाईकराव असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेत पती जीवाने गेला आणि मुलला जेलमध्ये जातांना बघण्याची वेळ दुर्दैवी मातेवर आली. दारूच्या व्यसनामुळे पाईकराव कुटुंब उध्वस्त झाले आहे.
झटापटीत दगड वडिलांच्या डोक्यात मारला !
पतीच्या सततच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून मायाबाई ह्या दोन मुलांना घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील इचोरी येथून अकोल्यातील कृषी नगरमध्ये राहण्यास आल्या होत्या. परंतु, अकोल्यातही दारुड्या पती किशोर हा मायबाईचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. किशोर घरी येऊन दारूच्या नशेत दररोज भांडण करून आई व लहान मुलाला मारहाण करायचा. शुक्रवारी सकाळी किशोर याने मद्याच्या नशेत पत्नी मायाबाईला मारण्यासाठी दगड उचलला. त्यामुळे मोठ्या मुलगा जितेंद्रकुमार याने दगड हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यावेळी बाप-बेट्यामध्ये झटापट सुरु झाली. याच झटापटीत जितेंद्रकुमारकडून दगड वडिलांच्या डोक्यात मारला गेला. यामुळे वडील जागीच गतप्राण झाले.
रागाच्या भरात घडला गुन्हा !
वडील हे सतत दारु पिऊन पत्नी व लहान मुलाला त्रास द्यायचे. शुक्रवारीसुद्धा दारू पिऊन आल्यावर त्यांनी आई व लहान भाऊला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, वडिलांनी दोघांना दगड घेऊन मारहाण करण्यास धावले होते. त्यामुळे वडिलांच्या हातातील दगड घेऊन, त्यांच्या डोक्यात घातला. वडिलांच्या कृत्यामुळे राग अनावर झाल्याने त्यांना मारहाण केल्याचे मुलगा जितेंद्र पाईकवार याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, संशयित आरोपी जितेंद्रकुमार हा बारावीचे शिक्षण घेत होता. त्याने नुकतीच वयाची १८ वर्ष पूर्ण केली होती. तर दुसरा मुलगा दहावीत शिकत आहे. दुसरीकडे पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांचा मृत्यू झाल्याचे पाहून घाबरलेल्या मुलगा जितेंद्रकुमार याने रक्ताने माखलेल्या दगडावर पाणी टाकत पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता.