नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पीसीवर अथवा लॅपटॉपवर प्रौढ चित्रपट (Adult Films) पाहणाऱ्या लोकांना गुन्हेगार लक्ष्य करत आहेत. लोकांना मंत्रालयाचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे कसे लुटले जातात, याबाबत एका सुरक्षा विभागातील जाणकाराने अधिक सांगितले आहे.
इंटरनेटचे सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरिया यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे की, प्रौढ साइट्सला भेट देणाऱ्या युजर्संच्या लॅपटॉप किंवा संगणकावर बनावट पॉप-अप पाहायला मिळत आहे. यामध्ये युजर्सना ॲडल्ट चित्रपट पाहिल्यामुळे त्यांचा कॉम्प्युटर ब्लॉक झाल्याचा इशारा देण्यात येत असून सिस्टम अनलॉक करण्याच्या बदल्यात युजर्सकडून पैशांची देखील मागणी केली जात आहे. या बनावट पॉप-अपमध्ये कायदा आणि न्याय मंत्रालय असे शब्द दिसत आहेत आणि ते युजर्संना सांगतात की त्यांचा संगणक डिक्री क्रमांक १७३-२७९ अंतर्गत ब्लॉक करण्यात आला आहे. सोबतच हे देखील सांगण्यात येत आहे की बेकायदेशीर कंटेट पाहिल्यामुळे तुमचा ब्राउझर लॉक झाला आहे. ते अनलॉक करण्यासाठी तुम्हाला व्हिसा किंवा मास्टरकार्डद्वारे सुमारे २९,००० रूपये भरावे लागतील.
दरम्यान, युजर्संना असा इशारा देखील देण्यात आला आहे की त्यांनी पैसे न भरल्यास किंवा वैयक्तिकपणे डिव्हाइस अनलॉक करण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. दंड भरण्यासाठी तुमच्याकडे ६ तास आहेत. त्यामुळे तुम्ही फसवणुकीत अडकू नका किंवा कोणालाही पैसे देऊ नका हे उघड आहे. हे पूर्णपणे बनावट आहे. सरकार हे करत नाही. जनतेला लुटण्याचे हे एक साधन बनले आहे.
लक्षणीय बाब म्हणजे यावरील उपाय आहे की ऑनलाइन प्रौढ साइट्सवर जाणून घेणे टाळणे अथवा त्याचा वापर न करणे. तरीही तुमच्या संगणकावर असे पॉप-अप दिसत असल्यास ब्राउझर विंडो थेट बंद करा. हे करूनही पॉप-अप बंद होत नसेल, तर ctrl+alt+delete द्वारे टास्क मॅनेजरकडे जा आणि तुमच्या ब्राउझरसाठीचा टास्क संपवा. या दोन्ही पद्धती कार्य करत नसल्यास सिस्टम सक्तीने बंद करा. हा एक सायबर धोक्याचाच प्रकार आहे यातून कोणत्याही युजर्सला लुबाडले जाऊ शकते.
















