चोपडा (प्रतिनिधी) ‘जय श्रीराम’ लिहलेल्या पिकअप गाडीमधून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या गाडीचालक व क्लिनरविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हातेड फाट्यावर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व चोपडा ग्रामिण पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्त करीत होते. त्याचवेळी चोपड्याकडे भरधाव वेगात जाणारी पिकअप गाडी आली. ही गाडी थांबवण्याची सूचना पोलिसांनी केली. परंतू चालकाने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत गाडी पळवून नेली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चोपडा शहरातील आशा टॉकीज भागात गोरक्षकांनी मदतीने वाहन पकडले. या गाडीत अवैधरित्या ८ गुरे कोंबून भरलेले आढळून आले.
यानंतर चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाणे यांच्या फिर्यावरून गाडी चालक अनुराग गंगाराम चव्हाण (वय २०) वय व सुशील संपत पवार (वय २१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एएसआय किशोर शिंदे करीत आहे. दरम्यान, ‘जय श्रीराम’ लिहिल्यावर आपली गाडी कोणी अडविणार नाही, असा आरोपींचा समज होता.