धरणगाव (प्रतिनिधी) संघटनेमध्ये काम करीत असताना अनुभव, अभ्यास, संयम फार महत्त्वाचे आहेत. झोकून देवून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मान असतो नवनवीन माहिती, शासनाचे पत्र, अध्यादेश याबाबत अद्यावत असणे गरजेचे असते. यामुळे आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण होते आणि हीच प्रतिमा अद्यावत माहिती, अभ्यास व्यक्तीला सर्वोच्च स्थानी पोहचवितो, असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी तथा जिल्हा भारत स्काऊट गाईड संस्थेचे उपाध्यक्ष नीलकंठ गायकवाड यांनी व्यक्त केले.
जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे के पाटील यांची राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्हा भारत स्काऊट गाईड संस्थेचेवतीने आयोजित गौरव समारंभ ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा संस्थेचे सदस्य पी ए पाटील, लीडर ट्रेनर बी व्हीं पवार, नगरसेविका दीपमाला काळे, चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपदी निवड होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी जे के पाटील यांचे निस्वार्थी काम, अभ्यास, संघटनेमधील योगदान, परिश्रम, तपचर्या आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. पाटील स्काऊट गाईड जिल्हा संस्थेचे उपाध्यक्ष देखील आहेत.
जे के यांची राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपदी निवड होणे अभिमान, प्रतिष्ठेची बाब असली तर तमाम शिक्षकांसाठी आणि शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक होते. यापूर्वी देखील राज्य मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भुषाविण्याचा मान जे के पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याला मिळालेला आहे. असा शब्दात वक्त्यांनी अभिनंदन केले. यावेळी पी ए पाटील, बी बी सोनवणे, आर सी गोसावी, डी एस पाटील, भास्करराव पवार आदींनी भावना व्यक्त केल्या. सत्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून राज्य मुख्याध्यापक संघमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो, त्यामुळे कामाचा अनुभव होता. जिल्ह्यातील शिक्षकांचा प्रेम आणि सहकार्यामुळेच वाटचाल सुरू असल्याच्या भावना व्यक्त केल्या. मात्र जबाबदारी वाढली असल्याचे देखील नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी व्ही पवार, सूत्र संचालन संजय बेलोरकर, आभार डी एस सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला नंदिनीबाई शाळेच्या मुख्याध्यापिका चारुलता पाटील, रवींद्र कोळी, भास्कर बोरुडे, संदीप सोनवणे, (भडगाव) कविता पाटील, एस बी चौधरी (बहादरपूर), मुख्याध्यापक चौधरी (निंबोला हायस्कूल) यांच्यासह जिल्ह्यातील स्कूटर गाईडर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा भारत स्काऊट गाईड संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.