मुंबई (वृत्तसंस्था) आदित्य ठाकरेच्या निकटवर्तीय राहूल कनाल (rahul kanal) यांच्या घरावर काल आयकर विभागाने छापेमारी केली. राहूल कनाल यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाची छापेमारी ही सुरूच असल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या एकामागून एक धाडी हे महाराष्ट्रावर दिल्लीचं आक्रमण आहे, अशी प्रतिक्रिया काल आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना दिल्लीतल्या राष्ट्रीय एजन्सीकडून टार्गेट केलं जात आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती सध्या धाडी टाकल्या जात असून त्याला आम्ही घाबरत नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने भाजप विरूध्द शिवसेना असं वातावरण आता चांगलचं तापलं आहे.
महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती
मंगळवारी सकाळी आयकर विभागाने आदित्य ठाकरेच्या निकटवर्तीय राहूल कनाल यांच्या घरी छापेमारीला सुरूवात केली. राहूल कनाल हे बांद्रा परिसरात राहतात. तिथं दिवसभर आयकर विभागाने त्यांची चौकशी केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दिवसभर चौकशी करत असताना कनाल यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तिथल्या परिसरात अनेक शिवसैनिक सुध्दा दिसत होते. रात्री उशिरा राहूल कनाल यांची चौकशी संपल्यानंतर पोलिसांनी राहूल यांच्या घरातून काही फायली चौकशीसाठी घेतले असल्याची माहिती मिळत आहे. चौकशी संपल्यानंतर बांद्रा घराच्या अनेक शिवसैनिक जमा झाले होते. त्यावेळी राहूल कनाळ यांनी शिवसैनिकांची भेट घेतली.