नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ऑगस्ट महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची रुग्णसंख्या ही ४० हजारांच्या आत आली आहे. देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ६८२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ६१७ लोकांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत ४० हजार ०१७ लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ताजी आकडेवारी जारी केली असून त्यानुसार, रोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. मागील २४ तासांत देशभरात ४० हजार ०१७ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ३८ हजार ६२८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ६१७ लोकांचा मृत्यू झाला. देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही ३,१८,९५,३८५ झाली आहे. तर, ४,१२,१५३ अॅक्टिव्ह रूग्ण संख्या असून, आजपर्यंत ३,१०,५५,८६१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, देशात आतापर्यंत ४,२७,३७१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. याचबरोबर देशात आतापर्यंत ५०,१०,०९,६०९ जणांचे लसीकरण झाले असून, यापैकी मागील २४ तासांत ४९,५५,१३८ जणांचे लसीकरण झाले आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात शुक्रवारी ५५३९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ हजार ८५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६१ लाख ३० हजार १३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के झाले आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे १८७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१ टक्के झाला आहे. तब्बल ३५ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ७४ हजार ४८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.