पुणे (वृत्तसंस्था) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष श्रीनाथ बनगिनवार (५४) यास एमबीबीएसच्या एका प्रवेशासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
४९ वर्षीय तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परिक्षा मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राउंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टअंतर्गत – २०२३ वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे संस्थात्मक कोट्यातून निवड झाली होती. या निवड यादीच्या आधारे एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयाचे तक्रारदार यांनी आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी अधिष्ठाता बनगिनवार यांची भेट घेतली. त्या वेळी बनगिरवार यांनी दरवर्षाची शासनमान्य विहित फी २२ लाख ५० हजार रुपयांव्यतिरिक्त प्रवेशासाठी १६ लाख रुपये लाच देण्याची मागणी केली.
परंतू लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे विद्यार्थ्याच्या पालकांनी एसीबीकडे धाव घेतली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सर्व घटनाक्रम ऐकून घेतला. त्यानंतर आरोपी डीनला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. डीनला वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 16 लाख रुपये देण्याचं मान्य करण्यात आले. पण हे पैसे दोन टप्प्यात द्यायचं तडजोडीअंती ठरलं होतं. तडजोडीअंती पहिला हप्ता १० लाख रुपयांचा ठरला होता. एसीबीने तक्रारीची खातरजमा करून मंगळवारी महाविद्यालयातील डीनच्या कार्यालयात ट्रॅप लावला. बनगिनवार याने पहिल्या हप्त्याचे १० लाख रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या.