चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील मेडीकल दुकानदाराला मारहाण करत त्यांच्या ताब्यातील 2 लाख 65 हजार रुपये असलेली बॅग हिसकावत चौघा अज्ञात तरुणांनी पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 15 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय हसमतराय मंदानी यांचे चाळीसगाव शहरात मेडीकल दुकान आहे. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ते शांतीनगर परिसरात आपल्या घरी जात होते. वाटेत गुरुमुख तलरेजा यांच्या घराजवळ त्यांची चौघा 25 ते 35 वयोगटातील अज्ञात तरुणांनी वाट अडवली. त्यांना मारहाण करत अॅक्टीव्हा वाहनावर पायदानावर ठेवलेली बॅग चौघांनी जबरीने हिसकावून नेली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के. पाटील हे करीत आहेत. मंदानी दिवसभरातील कॅश काऊंटरची रक्कम घरी घेवून जात असल्याची पाळत ठेऊन नंतर लुटमार केल्याचा संशय आहे. दरम्यान, जळगाव, धरणगावमधेही अशाच प्रकारे पाळत ठेऊन व्यापाऱ्यांची रोकड लांबविल्याच्या घटना घडल्या आहेत.