चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील एका रस्त्याचे काम अल्पावधीत पूर्ण झाल्याने नागरिकांना, विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना आणि रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने झाल्याने जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे. शहराच्या या झपाट्याने झालेल्या विकासकामाने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून काही विरोधकांना मात्र ही सकारात्मक प्रगती खटकताना दिसत आहे.
काही विरोधकांनी आचारसंहिता लागू असताना रस्ता पूर्ण करण्यात आल्याचा आक्षेप नोंदवला असला, तरी त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात त्यांनी घातलेला गोंधळ हा कायद्याचा उल्लंघन आहे.
चाळीसगावकरच योग्य धडा शिकवतील
विकासकामांवर नियमांचे ढाल म्हणून सतत आक्षेप घेण्याचा विरोधकांचा हा पवित्रा आता नागरिकांना कंटाळवाणा वाटू लागला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चाळीसगावकरच “चमकोगिरी” करणाऱ्या नेत्यांना योग्य धडा शिकवतील, अशी तीव्र प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.
दरम्यान, शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना दडपणाखाली ठेवण्यात आले, तेव्हा कायद्याचे काही नियम लागू नव्हते का? असा सरळ आणि संतप्त प्रश्नही नागरिक आता खुलेपणाने विचारत आहेत.
















