पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या चांदसर येथे शेतात ट्रॅक्टरला रोटव्हेटर जोडत असताना ते अचानक सुरू झाल्याने एकाचा त्यात पाय अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली.
चांदसर येथे रमेश सुका कोळी हे शेतीची कामे करून आपल्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आज सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान कृषी महाविद्यालय परिसरातील शेतात ते काम करत होते. शेतातील कामासाठी ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडण्याचे काम सुरू होते. या वेळी अचानक ते सुरू झाले. यात रमेश कोळी यांचा त्यात पाय अडकल्याने त्यांचा पायाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर या घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिस चौकीचे पी.एस.आय. मधुकर उंबरे, विठ्ठल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी जखमी अवस्थेत असलेल्या रमेश कोळी यांना खासगी वाहनातून जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुग्गड यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या वेळी त्यांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर चांदसर येथे दुपारी ४ वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.