यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव येथील ५८ वर्षीय वृद्धाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी वृद्धाच्या सुनेसह दोन जणांना अटक केली आहे. एलसीबीच्या पथकाने अवघ्या २४ तासात खुनाचा उलगडा करत दोघांना यावल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव बु. येथील भीमराव शंकर सोनवणे (५८) यांचा मृतदेह किनगाव-चुंचाळे रस्त्यावरील नाल्यावरील पुलाखाली शुक्रवारी सकाळी आढळून आला होता. आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. पथकाने किनगावातून गोपनीय माहिती मिळवली. त्यानुसार जावेद शाह ऊर्फ जय आलिशा (३२, रा. वरणगाव ह. मु. उदळी, ता. रावेर) यास उधळी येथून शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. तसेच सोनवणे यांच्या सुनेलाही अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनील मोरे तपास करीत आहेत. या पथकात पोहेका विजयसिंह पाटील, कमलाकर बागुल, सुधाकर अंभोरे, संदीप सावळे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, रणजित जाधव, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, प्रमोद ठाकूर यांचा समावेश होता.