जळगाव (प्रतिनिधी) हिस्सेवाटीच्या भावंडांमध्ये वाद सुरु आहे. याच वादातून एमआयडीसीतील व्ही सेक्टर मध्ये असलेल्या शक्ती प्लास्टीक इंडस्ट्रीज या कंपनीत सुमारे २० ते २५ जणाचे टोळके शस्त्र घेवून शिरले. यावेळी त्यांनी तेथे काम करणाऱ्यांवर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. जखमी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असता, पोलीस ठाण्यासमोर टोळक्याने त्यांना मारहाण केली. मात्र पोलिसांकडून त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.
मुंबई येथील अनिल मुन्शी विश्वकर्मा यांच्या मालकीची एमआयडीतील व्ही सेक्टरमध्ये शक्ती प्लास्टीक नावाने कारणावरुन कंपनी आहे. कंपनीत कामगार काम करीत असतांना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कमलेश विश्वकर्मा हे शस्त्रधारी असलेल्या सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याला सोबत घेवून कंपनीत शिरले. त्यांनी कंपनीतील साहित्याची तोडफोड करीत त्यांनी अनिल विश्वकर्मा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कामगार त्यांना टोळक्याच्या तावडीतून वाचविण्यासाठी गेले असता, टोळक्याने कामगारांना देखील बेदम मारहाण करीत त्यांच्यावर तलवार व चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत अनिल मुन्शी विश्वकर्मा (वय ४४, रा. मुंबई), नवनीत प्रल्हाद माहोरे (वय २२, रा. अमरावती, ह. मु. एमआयडीसी), राजू तुळशीराम विश्वकर्मा (वय ४०) व सत्वनसिंग दीपकसिंग बावरी (वय ३५) हे गंभीर जखमी झाले. मारहाणीत टोळक्याने केलेल्या शस्त्र हल्ल्यात यामध्ये राजू विश्वकर्मा याच्या कान कापला गेला असून नवनवीत याच्या डोक्यात देखील वार झाले आहे.
टोळक्याने हल्ला केल्यानंतर जखमींना घेवून महिला कर्मचारी त्यांना घेवून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आल्या. यावेळी टोळक्याने पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या महिलेला मारहाण केली. दरम्यान, पोलिसांनी टोळक्याला हटकल्यानंतर टोळके तेथून पसार झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी मेडीकल मेमो दिल्यानंतर जखमींवर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र टोळक्याने याठिकाणी देखील येवून जखमींना दमदाटी केल्याची माहिती अनिल विश्वकर्मा यांनी दिली. गेल्या काही महिन्यांमध्ये अनिल विश्वकर्मा यांनी एमआयडीसी पोलिसात चार वेळा तक्रार दिली. मात्र पोलिसांकडून एनसीवर बोळवण करीत कुठलीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. दरम्यान, या टोळक्यातील दोन ते तीन जणांनी गुरुवारी कंपनीत येवून विश्वकर्मा यांना कंपनी खाली करण्यासाठी धमकी दिली होती. त्यानंतर आज त्यांनी टोळक्याला आणून कंपनीत तोडफोड करुन कामगारांवर हल्ला केला.