जळगाव (प्रतिनिधी) मोबाईलवर बोलणारा तरुण मग्न असतांना सचखंड एक्सप्रेसच्या बोगीखाली आल्यामुळे पंचवीशीच्या वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी पावने दहा वाजेच्या सुमारास पिंप्राळा रेल्वे गेटजवळ घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास मनमाडच्या दिशेने सचखंड एक्सप्रेस जात असताना एक तरुण पिंप्राळा रेल्वे गेटजवळ मोबाईलवर बोलण्यात गर्क होता. रेल्वे रुळानजीकच तो मोबाईलवर बोलण्यात तल्लीन झाला होता. शेवटची बोगी जात असतांना रेल्वे निघून गेल्याचे समजून त्याने रुळ ओलांडण्यास सुरुवात केली. त्यावेळी रेल्वेची शेवटची बोगी जात होती. त्या शेवटच्या बोगीत तो अडकला व त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. घटनेची माहिती समजताच लोहमार्गचे सहायक फौजदार राजेश पुराणिक, सचिन भावसार यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मयत तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या खिशात काहीही आढळून आले नाही. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. सदर मयत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून तो परप्रांतीय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.