जळगाव (1 जानेवारी 2025) ः शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील सिल्व्हर पॅलेस हॉटेल आणि लॉजिंगच्या पैशांचा नोकरानेच अपहार केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी मंगळवारी दुपारी चार वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नोकराला अटक करण्यात आली. आदित्य सुनील वाघ असे संशयीताचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
एप्रिल ते डिसेंबर दरम्यान 8 लाख 14 हजारांची रोकड चोरी केल्याची घटना घडली आहे. जयंत रामदास पेठकर हे विनोद वाईन्स येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. त्यांचे मालकांचे रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेल सिल्व्हर पॅलेस नावाचे नामांकित हॉटेल आहे. हॉटेलमध्ये दररोज जमा होणारी रक्कम लॉजिंग काऊंटरच्या व्यवस्थापकाकडे जमा करण्यात येते. 28 डिसेंबर रोजी विनोद एजन्सीचे व्यवस्थापक योगेश महाशब्दे यांनी कामगार आदित्य सुनील वाघ याने नेहमीप्रमाणे हॉटेलमधून आणलेली ,व लाख 35 हजारांची रोकड जमा करून घेतली.
काही वेळाने हॉटेल सिल्व्हर पॅलेस रेस्टॉरंटचे व्यवस्थापक संजय पेंदोर यांनी महाशब्दे यांना फोन करून रक्कम जमा केली का? याबाबत विचारणा केली. महाशब्दे यांनी आदित्य वाघ याला फोन केला असता 45 हजारांच्या रोकडचे पाकीट चुकून बॅगेमध्ये राहिल्याचे सांगितले. रक्कम थोड्या वेळाने आणून आदित्य याने योगेश महाशब्दे यांच्याकडे जमा केली. योगेश याला सदर बाब संशयास्पद वाटल्याने त्याने प्रकार मालकांना सांगितला.
मालकांनी एप्रिल 2024 पासून हॉटेलच्या सर्व व्यवहारांची तपासणी केली असता दर महिन्याला काही काही दिवसांनी थोडी थोडी रक्कम कमी असल्याचे निर्दर्शनास आले. आदित्य सुनील वाघ रा.कानळदा रोड याने या कालावधीत नोकर या नात्याने त्याच्याकडे विश्वासाने दिलेली 8 लाख 14 हजारांची रक्कम योगेश महाशब्दे, हर्षल बागुल यांच्याकडे जमा न करत अपहार केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी आदित्य सुनील वाघ याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. आदित्य याची प्रकृती अचानक ढासळल्याने त्याला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.