सुरत (वृत्तसंस्था) गुजरातच्या सुरतमध्ये सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. येथे एका ट्रकनं लहान मुलांसह १८ जणांना चिरडले. या दुर्घटनेत 1३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर गंभीर जखमी आहेत. जखमींना सध्या सुरतच्या स्मीमेर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सोमवारी रात्री गुजरातच्या सूरतमध्ये एक भयंकर अपघात घडल्याचं समोर येतंय. अर्ध्या रात्री फुटपाथवर झोपलेल्या लोकांना एका अनियंत्रित झालेल्या एका ट्रकनं चिरडल्यानं हा अपघात घडला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या सूरत स्थित किम रोडच्या फुटपाथवर हा अपघात घडला. या फुटपाथवर जवळपास १८ जण गाढ झोपलेले होते. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या ट्रकसमोर अचानक एक वाहन आलं. त्यामुळे ट्रक चालकाचा स्टिअरिंगवरचा ताबा सुटला आणि हा ट्रक फुटपाथवर चढला. फुटपाथवर झोपलेल्या १८ जणांच्या शरीरावरून हा ट्रक गेला. या अपघातात १३ जण जागीच ठार झाले तर इतर गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृत आणि जखमी लोक हे मजूर म्हणून काम करतात. राजस्थानातून हे लोक पोटापाण्यासाठी सूरतमध्ये मजुरीवर काम करत होते. अपघाताची चौकशी सुरू आहे.
मिळेलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा महिन्यांचं एक स्त्री जातीचं बाळ वाचलं आहे. पण, तिच्या आई-वडिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व मजूर हे राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथील राहणारे असल्याची माहिती आहे. सध्या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. तर जखमींवर उपचार सुरु आहेत