नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना संसर्गाच्या दैनंदिन रुग्णवाढीत एका दिवसाच्या कमतरतेनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ३५ हजार १७८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ४४० कोरोना बाधितांना आपला जीव गमावावा लागला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात ३५,१७८ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३७,१६९ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. तर ४४० कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून देशात एकूण तीन कोटी २२ लाख ८५ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ३२ हजार ५१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी १४ लाख ८५ हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आहे. एकूण ३ लाख ६७ हजार रुग्ण अद्यापही उपचाराधिन आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १७ ऑगस्टपर्यंत देशभरात ५६ कोटी ६ लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी ५५.०५ लाख लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) नुसार, आतापर्यंत ४९ कोटी ८४ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी सुमारे १७.९७ लाख करोना चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल (मंगळवारी) ४,४०८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ हजार ४२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ०१ हजार १६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८७ टक्के आहे. राज्यात काल (मंगळवारी) ११६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे. तब्बल ४२ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ६१ हजार ३०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.