नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ३७ हजार १५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात ७२४ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने नुकतीच गेल्या २४ तासातली आकडेवारी जाहीर केली आहे. यावरुन हे लक्षात येत आहे की देशातल्या कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ झाली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात ३९ हजार ६४९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर सध्या देशात ४ लाख ५० हजार ८९९ रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात देशातल्या ७२४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता ४ लाखांच्याही वर गेली आहे. देशात आत्तापर्यंत ४ लाख ८ हजार ७६४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाही अजून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढत आहे. कोल्हापूरमध्ये हजार तर सांगलीमध्ये हजारच्या जवळपास दैनदिन रुग्ण आढळत आहेत. राज्यात मागील चोवीस तासांमध्ये ८ हजार ५३५ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर आज ६ हजार १३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत ५९,१२,४७९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के इतके झाले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण
काल दिवसभरात देशातल्या १२ लाख ३५ हजार २८७ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी ७ लाख ८६ हजार ४७९ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४ लाख ४८ हजार ८०८ इतकी आहे. त्यामुळे आता देशातल्या लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या ३७ कोटी ७३ लाख ५२ हजार ५०१ वर पोहोचली आहे.