नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. दरदिवशी ४० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद देशात केली जात आहे. देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ९८२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ५३३ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांमध्ये कोरोना संसर्गाचे ४२,९८२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४१,७२६ संक्रमित रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. त्याच वेळी, ५३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ४,११,०७६ झाली आहे, ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात ३,१८,१२,११४ कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी ३,०९,७४,७४८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४,२६,२९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल (बुधवारी) ६१२६ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ हजार ४३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६१ लाख १७ हजार ५६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६९ टक्के झाले आहे. राज्यात काल (बुधवारी) कोरोनामुळे १९५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१ टक्के झाला आहे. तब्बल ३६ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ७२ हजार ८१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
















