नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस घट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या २४ तासांत ५० हजार ८४८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर १ हजार ३५८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५० हजार ८४८ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच सलग ४१ दिवस नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ६८ हजार ८१७ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण संख्येत १९,३२७ रुग्णांची घट झाली आहे. सोमवारी ४२,६४० कोरोना रुग्ण आढळले होते.
देशात आतापर्यंत ३ कोटी २८ हजार ७०९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत २ कोटी ८९ लाख ९४ हजार ८५५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुळे ३ लाख ९० हजार ६६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या ६ लाख ४३ हजार १९४ रुग्ण उपचाराधीन आहेत. २२ जूनपर्यंत देशात २९ कोटी ४६ लाख नागरिकांना लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्याआधी ५४ लाख २४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती. तर आतापर्यंत ३९ कोटी ५९ लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
डेल्टा प्लसचे २२ रुग्ण
केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळसह देशभरात ‘डेल्टा प्लस’चे २२ रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ रुग्णांचा समावेश असल्याचे केंद्राचे म्हणणे असले तरी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात या नव्या विषाणूचे २१ रुग्ण आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्या अधिक असण्याची शक्यता आहे. ‘डेल्टा प्लस’च्या फैलावाचा वेग अधिक असल्याचे मानले जाते.
महाराष्ट्रात आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या २१ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे आणि बाधित रुग्णांचे नमुने तपासण्यांसह सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे. ‘डेल्टा प्लस’चे रत्नागिरीत नऊ, जळगावमध्ये सात, मुंबईत दोन आणि पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
राज्यातली स्थिती
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. आज ८ हजार ४७० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल ९ हजार ०४६ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,४२,२५८ इतकी झालीय. आज १८८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे.