नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. कोरोनाची लस घेतल्यानंतर आतापर्यंत लस घेतलेल्या व्यक्तीला उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापला जात होता. पण आता पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात बंगालच्या १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरण प्रमाणपत्रात पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांचे फोटो ठेवले जात आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या लस धोरणावर सातत्यानं प्रश्न उपस्थित करत असतात. तसेच सर्व लोकांना मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात सीएम ममता बॅनर्जी यांनी मुख्य मंदिरातील पुजार्यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिलेत. आता तिसर्या टप्प्यात बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फोटो बसविण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मोदींच्या फोटोबाबत केली होती तक्रार
विधानसभा निवडणुकांदरम्यान टीएमसीने लसीकरणाच्या प्रमाणपत्रात पंतप्रधान मोदींच्या चित्राबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तृणमूलने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, कोविड-१९ लसीकरणाच्या प्रमाणपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे. पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाला सांगितले होते की, कोविड-१९ लसीकरण प्रमाणपत्रात पंतप्रधान मोदींचा फोटो असून, पश्चिम बंगाल आणि अन्य निवडणुकीच्या राज्यांमध्ये को-विन प्लॅटफॉर्मद्वारे मिळणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे, हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे.