यवतमाळ (वृत्तसंस्था) राज्यभरात पोलिओ लसीकरणाची मोहिमे मोठ्या थाटामाटात राबवण्यात आली. पण, यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कोपरी पोलिओ लसीकरण केंद्रावर ही घटना समोर आली. १२ बालकांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चिमुकल्यांना जीवनदान देणाऱ्या पोलिओ लसीऐवजी मुलांना सॅनिटायझर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुऴे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. १ ते ५ वर्षांच्या मुलांना पोलिओचा लस दिला जात होता. त्यावेळी पोलिओ ऐवजी सॅनिटाझर पाजल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे १२ मुलांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मुलांना पोलिओचा डोस दिल्यानंतर उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी हे गौडबंगाल समोर आलं. सुरुवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला त्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल केले. मुलांना उलट्या होण्याचे कारण तपासले असता पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आले होते, हे उघड झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मुलांच्या पालकांनी घडलेल्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी यवतमाळच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
देशभरात पल्स पोलिओच्या लसीकरण मोहिमेला ३१ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. मुलांना पोलिओ होऊ नये म्हणून दोन पोलिओचे दोन थेंब दिले जातात. २ फेब्रुवारीपर्यंत देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत मुलांना पोलिओ लस दिली जाते. ३० जानेवारीला राष्ट्रपती भवनामध्ये काही मुलांना पोलिओचे दोन थेंब देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या लसीकरण मोहिमेला यवतमाळमध्ये गालबोट लागलं आहे. तब्बल १२ मुलं पोलिओ लस घेतल्यानंतर त्रास झाला. या प्रकरणी जिल्ह्याधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन मुलांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. तर या प्रकरणी कोणाची चूक आहे हे शोधून काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हा प्रकार घडला तेव्हा आरोग्य केंद्रावर आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.