जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाळधी गावात 31 डिसेंबरच्या रात्री झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेने गावात तणाव निर्माण झाला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला, ज्यामुळे हा हिंसाचार झाला.
प्राथमिक माहितीनुसार, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नींना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाने हॉर्न वाजवला, यामुळे गावातील काही तरुणांनी शिवीगाळ केली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही गटांमध्ये वाद उफाळला. या वादातून संतप्त जमावाने दगडफेक केली आणि 12 ते 15 दुकानांना आग लावली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र जाळपोळ करणारे तरुण तेव्हा पसार झाले होते. गावात तणावपूर्ण शांतता असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवून संशयितांचा शोध सुरू केला आहे.
घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. सध्या पाळधी गावात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, दोषींवर लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.