नंदुरबार (वृत्तसंस्था) नंदुरबार शहरातील १२ व्यावसायिकांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकाने छापे टाकले आहेत, तर अक्कलकुवा व लगतच्या गुजरातमधील वेळदा येथील एकाकडे प्राप्तिकर विभागाच्या पथकाने दिवसभर ठाण मांडून तपासणी केली. दरम्यान, या धाडीत एका सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित बिल्डर्स लॉबीवर कारवाई झाली आहे.
तपासणी करण्यात आलेले सर्व व्यावसायिक एकमेकांशी कनेक्टेड असल्याची माहिती आहे. शहरातील बिल्डर्स, जमीन व्यावसायिक, व्यापाऱ्यांचे या छाप्यांनी धाबे दणाणले आहे. दिवसभर अनेक प्रतिष्ठाने बंदच राहिली. आजची पहाट काही बिल्डर्स व जमीनमाफियांकडे प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळेस धाड टाकल्याचा चर्चेने उगवली. प्राप्तिकरच्या धाडीची वार्ता शहरात पसरताच शहरातील मोठमोठ्या घोटाळेबहाद्दरांचे धाबे दणाणले. अनेकांनी मोबाईल बंद करत आपली कार्यालये, घरे बंद करून बाहेरगावी निघून जाणे पसंत केले. शहरातील काही नामांकित बिल्डर्सच्या घरी मात्र प्राप्तिकर विभागाच्या पथकाने दिवसभर ठाण मांडून तपासणी केली.
त्यानुसार अनेक बिल्डर्सकडे दोन ते चार वाहने, बंगल्याचे गेट बंद, बाहेर पोलिस पहारा तैनात व काही अधिकाऱ्यांची पथके दिसून आली. त्यात शहरातील किमान दहा ठिकाणी अशी तपासणी सुरू होती. त्याचबरोबर अक्कलकुवा येथेही एका व्यापाऱ्याकडे, तर नंदुरबार शहरालगत असलेल्या गुजरातमधील वेळदा या गावातही एक पथक पोचले होते. पथक मिळालेल्या माहितीनुसार गुगल मॅपद्वारे त्या-त्या बंगल्यांपर्यंत पोचत होते. मात्र याबाबत अधिकृत माहिती देणे टाळले. कारवाईचे गूढ गुलदस्त्यातच आहे. मात्र या कारवाईमुळे शहरातील मोठमोठे व्यापारी आपली प्रतिष्ठाने बंद करून नॉट रिचेबल झाले होते.
आजची कारवाई ही एका सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित बिल्डर्स लॉबीवर झाली आहे. भविष्यात राजकारणात जोमात उतरण्याच्या तयारीत असलेल्या एका बिल्डरचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे ही कारवाई टार्गेट केलेली तर नाही ना, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच बिल्डर्सशी संबंधित इतर व्यक्तींकडेही प्राप्तिकर विभागाची पथके धडकली होती. त्यामुळे यात राजकारण तर नाही ना, अशी चर्चा आहे.