सिडनी (वृत्तसंस्था) टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी २९ नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने ३ एकदिवसीय सामन्यात १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाला या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे.
या सामन्यात टीम इंडियासमोर ‘करो या मरो’ची स्थिती असणार आहे. या सामन्याला सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव केला होता. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर कर्णधार अॅरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांना रोखण्याचं आव्हान असणार आहे. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतकी कामगिरी केली होती. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी तगडं आव्हान दिलं होतं. यामुळे टीम इंडियाला या दुसऱ्या सामन्यात जिंकायचं असेल, तर या दोघांना रोखावं लागेल. पहिल्या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलला दुखापतीमुळे 10 ओव्हर टाकल्यानंतर मैदानाबाहेर जावं लागलं. तर वेगवान गोलंजदाज नवदीप सैनीला कमरेला दुखापत झाली. त्यामुळे जर या दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली, तर सैनीच्या जागी शार्दूल ठाकूर आणि चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते.