अमळनेर (प्रतिनिधी) येथील तांबापुरातील शिवाजी हायस्कूल, जुनिअर कॉलेजमध्ये शिक्षिकेला अन्य शिक्षक आणि शिक्षिकांनी जातीवरून हीन वागणूक देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ७ जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित महिला शिक्षिकेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, तांबापुरातील शिवाजी हायस्कूल, जुनिअर कॉलेजमध्ये त्या शिक्षिका आहेत. २८ जानेवारीला कर्तव्यावर असताना शाळेतील महिला कक्षात गेल्यावर बसण्यासाठी त्यांनी खुर्ची घेतली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या शिक्षिका ललिता वंजी पाटील, शीतल दिलीप देसले, संगीता प्रकाश पाटील, अलका शिवाजी देवरे यांनी त्यांना जातीवरून हीन वागणूक दिली. तर महिला कक्षातून रडत बाहेर पडल्यावर सुधाकर मुरलीधर पाटील, संजय प्रल्हाद पाटील, संदीप अशोकपुरी गोसावी हे ही हसू लागले. तर शिपायाला पाणी मागितले, तर त्यांनाही पाणी देऊ दिले नाही. तसेच मुख्याध्यापकाच्या कक्षात येऊन पुन्हा शिवीगाळ करू लागले. तर मुख्याध्यापकांनाही बाजू घेतल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार घरी पतीला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी सुधाकर पाटील, संजय पाटील, संदीप गोसावी, ललिता पाटील, शीतल देसले, संगीता पाटील, अलका देवरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप करत आहेत