नागपूर (वृत्तसंस्था) यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १० वर्षीय मुलीवर भाडेकरूने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाड्याने राहणाऱ्या या ६५ वर्षीय नराधमाने तिला गच्चीवर नेत तिच्यासोबत लैंगिक कृत्य केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. मोहम्मद इद्रीस शेख, असे आरोपीचे नाव आहे.
यशोधरानगर पोलीस ठाण्यांतर्गत पीडिता ही वास्तव्याला आहे. येथेच आरोपी मोहम्मद इद्रीस शेख हादेखील भाड्याने राहतो. एकाच परिसरात असल्यामुळे पीडितेच्या घरच्यांची आरोपीशी ओळख आहे. मात्र या ओळखीचा आरोपीने गैरफायदा उचलला. त्याची वाईट नजर ही १० वर्षीय मुलीवर होती. ११ जुलै रोजी आरोपीने रात्री ९.३० वाजताच्या सुमारास या मुलीला गच्चीवर आणले. येथे त्याने तिचे जबरदस्तीने लैंगिक शोषण केले. हा प्रकार सुरू असताना तिथे दुसरा भाडेकरू आल्याने आरोपीचे बिंग फुटले.
आपला प्रकार इतरांना कळण्यापूर्वीच आरोपी तेथून पळून गेला. तिकडे भाडेकरूने गच्चीवरची बाब पीडितेच्या घरच्यांना सांगितली. दरम्यान घरच्यांनी मुलीला याबाबत विचारणा केली असता तिने मोहम्मद इद्रीस शेख याने तिचा लैंगिक छळ केल्याचे सांगितले. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी थेट यशोधरानगर पोलीस ठाण्या धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.