भुसावळ (प्रतिनिधी) – प्रेमविवाह केल्यामुळे एका तरुणावर अमानुष अत्याचार करून त्याला नग्न अवस्थेत खांबाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. याच प्रकरणात तरुणाच्या पत्नीचेही अपहरण केले असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील खडका येथील पीडित चेतन दिलीप जंगले (वय २५) या तरुणाने १८ मार्चला नाशिकच्या पंचवटी परिसरात शिरपूर कन्हाळा येथील एका युवतीसोबत प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर त्यांनी नातेवाईकांना ही माहिती दिली होती. तर, १९ मार्चला दोघे भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले अन् विवाहाची नोंद दिल्यानंतर ते चेतनच्या मामाच्या घरी मुक्कामी थांबले. दरम्यान, २० मार्चला दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास मुलीचे नातेवाईक मनोज पाटील, रूपाली उर्फ पूनम पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील यांच्यासह १० ते १२ जणांनी बळजबरीने घरात प्रवेश करुन युवतीला मारहाण करत तिला इच्छेविरुद्ध पळवून नेले. यानंतर संशयितांनी चेतन जंगले याला बेदम मारहाण केली. तसेच त्याचा गळा आवळून ठार मारण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर त्याला घराबाहेर ओढून खांबाला बांधले, तर नग्न करून लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. तसेच मुलीला सोडून दे, असा कबुलीजबाब जबरदस्ती घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच संशयितांनी पुढे त्याला दुचाकीवरून खडका येथे नेले आणि घरापर्यंत मारहाण केली. घरी नेवून त्याच्या आई-वडिलांनाही मारहाण व शिवीगाळ करत घर जाळण्याची धमकी दिली. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून चेतनची सुटका केली. गंभीर जखमी असलेल्या चेतनला जळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याचा हात, फॅक्टर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. नितीन देशमुख तपास करत आहेत.
वरिष्ठ अधिकारी यांनी दिली भेट
अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्यात. दरम्यान, कोमल प्रकाश पाटील (२४), विजय नरोत्तम पाटील (५२), हेरंब महेश चौधरी (१९), ज्ञानेश्वर भास्कर भोई (१९) व संजय सोनू बढे (६१) या पाच संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेमविवाहावरून घडलेल्या या अमानुष घटनेमुळे भुसावळसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.















