भुसावळ (प्रतिनिधी) आ. संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधी मधून भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरला “अत्याधुनिक व्हेंटिलेटर युक्त कॅर्डिंयाक प्राणवाहिकेचे लोकार्पण,” सोहळा आज महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थित पार पडला. यावेळी भाजप वैद्यकीय आघाडीने कोरोना संबंधित सूचनांचे निवेदन सादर केले.
भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. नरेंद्र ठाकुर, जळगाव ग्रामीण जिल्हाअध्यक्ष, डॉ. धर्मेंद्र पाटील जळगाव महानगर अध्यक्ष, यांनी आज भुसावळ येथे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.
१. कोरोना प्रादुर्भाव वाढत असतांना ग्रामीण भागात, खेडोपाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याठिकाणी रुग्ण सेवा करणारे कंत्राटी BAMS डॉक्टर मंडळी यांचाच आधार होता. आता, बंधपत्रित MBBS डॉक्टर यांना ग्रामीण भागात १ वर्ष सेवा देणे बंधनकारक असल्याने राज्यातील जवळपास ८०० च्या वर कंत्राटी BAMS डॉक्टरांच्या नोकरीवर गदा आली आहे. तेव्हा फक्त “शाब्दिक कोरोना योध्दा सम्मान” हे बिरुद न लावता सर्व कंत्राटी BAMS डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या सेवेचा सन्मान करत, धोरणात्मक निर्णय घेत या सर्वांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे.
२. शहीद कोरोना योद्धा यांचे सर्व कोरोना विमा कवच हे दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड याच्या द्वारे सेटल/पास होत असून मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसांना लवकरात लवकर विमा कवचाचा लाभ मिळावा, त्यांचा मानसिक त्रास कमी व्हावा, तसेच सर्वांचा वेळ आणि पैसे वाचावे म्हणून सदर कंपनीद्वारे “प्रत्येक जिल्हास्तरावर एक विमा प्रतिनिधी नेमावा” जो हेच कार्य पार पाडेल आणि काही अपूर्णता असल्यास लगेच पूर्तता करण्यात येईल. त्यानंतरच सदर प्रकरण पुढील कारवाईसाठी पुढे पाठवावे, यामुळे वेळ, शाररीक श्रम, आणि पैसा तर वाचेलच पण मयत कुटुंबियांना पण मानसिक दिलासा मिळेल. या प्रमुख दोन मागण्याचे निवेदन वैद्यकीय आघाडीमार्फत देण्यात आले.
यावेळी माजी जल संपदा मंत्री गिरीश महाजन, रावेर लोकसभा मतदार संघाचे खासदार रक्षाताई खडसे, जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील, भुसावळचे आमदार संजूभाऊ सावकारे, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, माजी आमदार स्मिता ताई वाघ, अशोक कांडेलकर आदींची उपस्थिती होती.