धरणगाव (प्रतिनिधी) संरक्षक भिंती व रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून चौकशी करावी, अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा माजी नगरसेवक भागवत चौधरी यांनी धरणगाव मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
भागवत भगवान चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणगाव नगरपालिका हद्दीतील चोपडा रस्त्यापासून ते महादेव मंदिरा पावेतो झालेल्या संरक्षक भिंती तसेच रस्त्यांचे बांधकाम नित्कृष्ट झाल्याचे अनेकवेळा तक्रारी केलेल्या आहेत. तसेच केलेल्या मागणीनुसार थर्ड पार्टी ऑडिट करतांना तक्रार कर्ते यांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नव्हती. त्याचप्रमाणे सदर थर्ड पार्टी अहवालात त्रुटी आढळून आल्याचे नमूद केले आहे. असे असताना आपण संबंधितांवर गुन्हे दाखल न करता संबंधितांना पाठीशी घालत असून आपण लोक निधीचा अपव्यय करीत असून आपण आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहात.
अन्यथा करणार आमरण उपोषण
आपण येत्या आठ दिवसांत म्हणजेच पुढील दिनांक ०२/०४/२०२५ चार बुधवार रोजी पावेतो चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अन्यथा मी, उपोषण कर्ता भागवत भगवान चौधरी दिनांक ०३/०४/२०२५ रोजी पासून धरणगाव नगरपरिषद गेटवर किंवा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारकाजवळ आमरण उपोषणाला बसणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी विधी सल्लागार म्हणून एड. शरद माळी हे उपस्थित होते.