धुळे (प्रतिनिधी) नेर गावाच्या शिवारात असलेल्या सुरत-नागपूर बायपास महामार्गावर भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले तर एक वृध्द महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी धुळ्यातील हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,घरातील कर्ता पुरुष मयत झाल्याने त्यांच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी नेर ग्रामस्थांनी तब्बल तीन तास रस्तारोको आंदोलन केले.
नेर ता. धुळे गावातील महालकाळी शेती शिवारात वास्तव्यास असलेले देवा भिल (४२), भटाबाई श्रीराम सूर्यवंशी (६६), पूनम छोटू माळीच (१४) असे तिघे जण काल (दि.१) सायंकाळी नेर गावात बाजारासाठी आले होते. बाजार करुन ते दुचाकीने घरी परतत असतांना सुरत-नागपूर बायपास महामार्गावर रस्ता ओलांडतांना सुरतकडून नागपूरकडे भरधाव वेगाने जाणारा कंटेनरने (एनएल ०१/एई-७७७०) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक देवा भिल, पूनम माळीच हे दोघे जागीच ठार झाले. तर वृद्ध महिला भटाबाई या गंभीर जखमी झाल्यात. त्यांना धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरुन अपघातानंतर ग्रामस्थांनी रुग्णवाहीकेला संपर्क केला. मात्र संपर्क करूनही तासाभर रुग्णवाहीका उपलब्ध झाली नाही. अखेर उपचाराअभावी बालीका पूनम माळीच हीला प्राण गमवावे लागले. वेळीच रुग्णवाहीका उपलब्ध झाली असती तर बालिका पुनम हीला वाचविता आले असते.
मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविणारा कर्ता पुरुष देवा भिल हे जागीच ठार झाल्याने आदिवासी कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी नेर ग्रामस्थानी सलग तीन तास रस्तारोको आंदोलन केले. पोलिसांनी रस्तारोको करणाऱ्या ग्रामस्थांची समजूत घातली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता निखिल महाले, उपअधीक्षक साजन सोनवणे यांनी देखील मृत देवा भिल, पूनम माळीच यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून आदिवासी कुटुंबाला शासकीय मदतीचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मृतांना रस्त्यावरुन उचलून हिरे रुग्णालयात नेण्याची परवानगी दिली. यानंतर पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली.