नागपूर (वृत्तसंस्था) जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे, तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे, हे लक्षात आलं आहे. असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं असून शिवसेनेकडून भाजपावर सामना संपादकीयच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात आली आहे. संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत त्यावर बोलायचे नाही लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार असं शिवसेनेने म्हटलं आहे. दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस सकाळी नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “अधिवेशनात काहीच फलित नाही, सगळ्यात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी त्यांना सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे”.
“अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने आम्ही वीज जोडणी कापणार नाही. त्याला स्थगिती दिली आहे, असे सांगितले होते. पण शेवटच्या दिवशी अतिशय थातूरमातूर निवदेन करुन पुन्हा एकदा वीज जोडणी कापणी सुरु केलं आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. तसेच यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आणि गरीब विरोधी आहे, हे स्पष्ट झालं आहे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“सरकारला अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना दिसतो”
“या अधिवेशनात काहीही मिळालं नाही. सर्वात जास्त विदर्भ आणि मराठवाड्याची निराशा झाली आहे. कोरोना वाढतोय, सरकारचं याकडे लक्ष नाही, सरकारचं नियोजन नाही. अधिवेशनाच्या आधी कोरोना वाढतो, अधिवेशनात कमी होतो आणि अधिवेशनानंतर पुन्हा वाढतो, सरकारला अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना दिसतो,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.
दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात तीन महिन्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असताना फडणवीसांनी बोलण्यास नकार दिला आणि त्याबद्दल सुधीरभाऊच सांगू शकतील असं सांगितलं.