पाचोरा (प्रतिनिधी) शिवसेनेचे दोन गट पडण्यामागे भाजपचंच मिशन होतं. हे गुपित मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी एका सभेत सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या सभेला मंत्री गिरीश महाजनांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मंत्री गुलाबराव पाटीलही (Gulabrao Patil) उपस्थित होते.
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा भाजपचाच डाव असल्याची कबुली दिली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून ठाकरे गटाकडून तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिवसेनेतील बंडामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप वारंवार केला जात होता. परंतू आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन असल्याचे सांगून थेट कबुलीच देऊन टाकली आहे.
मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथजी पुढे निघाले. ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलंच. सारं जुळून आलं. घडून आलं. हे सर्व मिशन एवढं सोपं नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतात, उद्धव ठाकरे यांना कंटाळून ते बाहेर पडतात. सतरा अठरा लोक घेऊन बाहेर पडायचं आणि पन्नासपर्यंत मजल गाठायची, हे खूप अवघड होतं. मध्येच मिशन फेल झालं तर काय करायचं? असं वाटायचं. मात्र पुढारी कसे असतात, तुम्हाला माहिती आहे. आम्ही कसे असतो, तुम्हाला माहिती आहे, असं गिरीश महाजन म्हणाले. हे म्हणताच उपस्थितांमध्ये एकाच हंशा पिकला होता.
















