मुंबई (वृत्तसंस्था) कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून त्याच्याबरोबरच कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची गरज आज ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी अधोरेखित केली.
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाने उद्घाटन झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या परिषदेत राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले आणि जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
… तर कोविड पसरण्याची शक्यता – डॉ. मेहुल मेहता
अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातील डॉ. मेहुल मेहता यांनी संभाव्य तिसरी लाट आणि त्यामागची कारणे शोधली पाहिजे असे सांगून आज कोरोना संपला असे आपल्याला वाटायला लागले म्हणून अनेक लोक मास्क वापरत नाहीत, सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळे मोठ्या संख्येने करायला लागले त्यातून कोविड पसरण्याची शक्यता आहे. अजूनही लस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. त्यातच विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा फ़ैलाव वेगाने होतो आहे, डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आल्याचे सांगून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉ. मेहता यांनी केले.
प्रत्येकाने ‘जाणता मी, जबाबदार मी’ भूमिका घेण्याची गरज – डॉ. संजय ओक
संभाव्य लाटेची शक्यता गृहित धरून राज्य शासन, डॉक्टर्स, रुग्णालये यांनी तयारी सुरु केली आहे, मात्र या संपूर्ण प्रक्रियेत कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली. कोविडची विविध लक्षणे आढळली, काही रुग्णांना चव आणि वास येत नाही, पोटरीचे स्नायू आणि पाटदुखी वाढली, डायरिया, उलटी होण्याचे लक्षणे दिसले. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर ‘कोविड नाही ना?’ हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकाने आपल्या मनाला विचारणे आवश्यक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ नंतर ‘जाणता मी, जबाबदार मी’ ही भूमिका घेण्याची गरजही डॉ. ओक यांनी व्यक्त केली.
दुखणं अंगावर काढण्याची सवय महागात पडू शकते, यात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची असून आपल्या रुग्णांची केवळ स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लॅप्टो आदी आजारांची लक्षणे एकसारखीच असून एनएसवनएनएसटू बरोबरच मलेरिया, लॅप्टोच्या चाचण्यांसह कोविडसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचेही डॉ. ओक यांनी सांगितले. कोविड हे तीन आठवड्याचे दुखणे आहे, त्यातील दुसऱ्या आठवड्यातील शेवटचे दिवस हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तीन आठवडे काळजीपूर्वक विलगीकरणात अथवा रुग्णालयात राहून काळजी घेण्याची गरज आहे. कोविड झाल्यानंतर उपचार, विलगीकरण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आवश्यक असून हा रोग लपविण्याची कोणतीही आवश्यकता नाही, शासन दरबारी याची नोंद होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसचा फटका बसला त्याच्या निदानासाठी सिटी स्कॅनपेक्षा एमआरआय करणे आवश्यक असल्याचे सांगतानाच सध्या तरी कोविडपासून संरक्षणासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून मास्क घालणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे सांगण्याची वेळ आली आहे, असेही डॉ. ओक यांनी सांगितले.
प्रत्येक स्ट्रेनवर मास्क प्रभावी – डॉ. शशांक जोशी
मास्क घालून कोविडला घराच्या उंबरठ्याच्याबाहेरच ठेवणे हे आपले सर्वाचे आद्यकर्तव्य असल्याचे डॉ. शशांक जोशी यावेळी म्हणाले. कोरोनाच्या या पहिल्या, दुसऱ्या लाटेत आपल्याला हर्ड आणि हायब्रीड इम्युनिटी पहायला मिळाली. राज्य शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष पुरवल्यामुळे धारावीत परिस्थिती यशस्वीपणे हाताळता आली, दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये रोजची रुग्णसंख्या २० पेक्षा अधिक आढळले नाहीत हे केवळ हर्ड इम्युनिटीमुळे झाल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. कोविडची लक्षणे आढळली तरी विलगीकरणात राहून संपर्क तोडा, चाचणी करा, ऑक्सिजन दर, नाडीचे ठोके, ताप, आदींच्या नोंदी करा, ज्यांच्या संपर्कात आलात त्यांनाही चाचणी करायला सांगा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांशी डॉक्टरांनी बोलण्याचे आवाहन करतानाच मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून दुहेरी मास्क संरक्षणासाठी मजबूत ढाल असल्याचेही यावेळी डॉ. जोशी यांनी सांगितले.
लक्षणे दिसताच चाचणी करा – डॉ. राहुल पंडित
फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित म्हणाले की, कोविडने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, शिस्त लावली. एखाद्या गुरुसारखे कोविडने आपल्याला शिकवले आहे. नव्या लक्षणांकडे लक्ष ठेवतानाच हाय रिस्क फॅक्टरमधील रुग्णांना जपण्याचे आवाहन त्यांनी केले. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करतानाच रोज मास्क बदला आणि ओला झालेला मास्क कधीही लावू नका तो तात्काळ बदलण्याच्या सूचना देतानाच कोविडचे लक्षणे दिसली की वेळेत चाचण्या करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑक्सिजन प्रमाण ९३ पेक्षा कमी झाले असेल तर पोटावर झोपण्याचा सल्ला आम्ही देतो, त्याचे निश्चितच चांगले परिणाम बघायला मिळतात.
कोविडपश्चात जीवनशैली चांगली ठेवा – डॉ. अजित देसाई
डॉ. अजित देसाई कोविड पश्चात लक्षणे ही मुख्यतः ४ ते १२ आठवडे असतात, ही केवळ गंभीर रुग्णांमध्येच नाहीत तर साधारण आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा ही लक्षणे दिसतात. सहा महिन्यापर्यंत ही लक्षणे असली तरी ती दीर्घ काळची लक्षणे मानले जातात, थकवा, सांधेदुखी, श्वसनास त्रास, ताणतणाव, निद्रानाश, भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून तणावात जाणे, डोकेदुखी, छातीत वेदना आदी त्रास होतात. कोविड लक्षणांच्या काळात ईसीजीमध्ये अथवा टूडी इको मध्ये काही आढळल्यास त्यावर उपचार करणे खूप आवश्यक असते. ताण तणाव, चिंता असेल तेव्हा कुटुंबातील सदस्य, मित्रांबरोबर बोला त्यापेक्षाही अधिक गंभीर स्वरुपाचा तणाव असेल तर मानसोपचार तज्ज्ञांशी बोलण्याचा सल्ला देऊन कोविड पश्चात आपली जीवनशैली अधिकाधिक चांगली ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. देसाई यांनी केले.
पहिल्या दोन लाटांमध्ये मुलांमध्ये कमी संक्रमण – डॉ. सुहास प्रभू
बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणती काळजी घेतली पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि काही पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पहिल्या दोन लाटेमध्ये मुलांमध्ये कोविडचे कमी संक्रमण झाले. मुलांनी देखील संभाव्य धोका लक्षात घेता मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
ज्या मुलांमध्ये संक्रमण झाले तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते, त्यांच्यावर घरीही उपचार करू शकतो, रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत, गंभीर लक्षणे आढळल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहेत, मुलाबरोबर पालकापैकी एकाला या मुलांसाठीच्या कोविडसेंटरमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे असे सांगून या आजारामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ नये याकरिता त्यांच्याशी फोनवरुन अथवा इतर माध्यमांद्वारे संवाद साधणे अधिक गरजेचे आहे. शाळा सुरू होण्याअगोदर पुरेशी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रभू यांनी सांगितले. नवजात शिशु आणि आई यांची काळजी घेत असतानाच आईला जर कोविड असेल तर बाळाची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.