छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) एक लाखाच्या बदल्यात एक कोटींचा पाऊस पाडतो अशी भूलथाप देऊन शफियाबाद येथील तरुणाची तीन लाखांची रक्कम घेऊन पसार झालेल्या भामट्यास पोलिसांनी दोन महिन्यानंतर मोठ्या शिताफीने जळगाव येथून अटक केली. दिलावर गुलाब पिंजारी (रा. देवगाव ता. पारोळा जि. जळगाव) असे या भामट्याचे नाव आहे. त्याच्याकडून वरील रक्कमही हस्तगत करण्यात आली.
पिशोर येथून सात-आठ किलोमीटरवर असलेल्या शफियाबाद येथील बाबासाहेब दिलीप मोकासे या तरुणास जळगाव जिल्ह्यातील एका भामट्याने एक लाखात एक कोटीचा पाऊस पाडणार असल्याचे आमिष दाखविले. यासाठी विशेष पूजा करावी लागेल असे सांगितले. बाबासाहेबने स्वतःच्या घरात पूजा मांडून ३ लाख ११ हजार रुपये ठेवले. चार तास मंत्र पाठ केल्यानंतर नाशिक येथून पूजेसाठी काही वस्तू आणायचे आहे, तुम्हीही सोबत चला असे सांगून ही रक्कम घेऊन दोघेही नाशिकला गेले. यानंतर संधी साधून भामटा ही रक्कम घेऊन पसार झाला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बाबासाहेबने पिशोर पोलीस ठाणे तक्रार दिली. तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सपोनी कोमल शिंदे यांनी हे प्रकरण बीट जमादार किरण गंडे यांच्याकडे सोपविले. गंडे यांनी तब्बल दोन महिने तपास करून या भामट्यास जळगावमधून अटक केली. त्याच्याकडून फसवणूकीची रक्कम हस्तगत करण्यात आली. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.