जळगाव, ( प्रतिनिधी )- ब्लु स्टार क्लब झेटीएस भुसावळ आयोजित फुटबॉल नाईट टुर्नामेंट स्पर्धा ही दि. २१ ते २६ जानेवारी दरम्यान झेडआरटीआय फुटबॉल ग्राऊंडवर संपन्न झाल्यात. सेवन ए साईड नाईट टुर्नामेंट या स्पर्धेचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री आ. संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले होते. पारितोषिक वितरणाप्रसंगी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, श्रीकांत चौधरी, अमन चौधरी उपस्थित होते.
या स्पर्धेत मध्यप्रदेश मधील, महाराष्ट्र या राज्यांतील २४ संघ सहभागी होते. यामध्ये जैन इरिगेश फुटबॉल संघाने पहिला सामना ५-० ने जिंकला. दुसरा सामना ३-१, तिसरा ३-०, तसेच चौथा ३-० ने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. जैन इरिगेशन अंतिम सामना जालना च्या फुटबॉल संघासोबत झाला. हा अत्यंत रोमांचकारी झालेला सामना ३-१ ने जैन इरिगेशनच्या फुटबॉल संघाने जिंकला. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून जैन इरिगशनचा अमनसिंग रावत याला गोल्डन बुट देऊन सम्मानित करण्यात आले. अमनसिंग रावत ने बचात्मक खेळीसह महत्त्वाच्या वेळी ५ गोल केले तसेच चार सहाय्यक गोल केले. या स्पर्धेत फहाद खान या गोलरक्षकाने आपल्या गोल मधून समोरच्या गोलमध्ये विशेष गोल केला ही बाब स्पर्धेत आकर्षण ठरली.
अमनसिंग रावत ५, फवाज अहमद २, सुरज सपके २, लक्ष्य हरपनानी १, मिराज खान १, मयूर मोरे १, अमित कोळी १ यांनी गोल केले त्यांच्यासोबत अरबाज खान, निखील माळी, यश फार्सवॉन, फहाद खान यांनी संघात उत्कृष्ट योगदान दिले. मुख्य संघ प्रशिक्षक म्हणून अब्दुल मोहसिन यांनी काम पाहिले. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे अतुल जैन, अभंज जैन यांच्यासह अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी कौतूक केले.
















