जळगाव (प्रतिनिधी) जुन्या वादातून समता नगरातील अरुण बळीराम सोनवणे (वय २८,रा. समता नगर) या तरुणाचा रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चॉपरने वार करून गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाच संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने तपासचक्र फिरवीत कुलदीप सोनू आढळे या संशयिताला ताब्यात घेतले आहे.
सोनू आढळेला एलसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात !
रामानंद पोलिसात गोकुळ बळीराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून सोनू आढळे, पप्पू आढळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड, दोद्या उर्फ पिंट्या शिरसाठ (सर्व रा. समतानगर जळगाव), यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून झाल्यापासून मारेकरी फरार झाले होते. तेव्हापासून एलसीबीच्या पथकाकडून त्यांचा शोध घेतला जात होता. पो.नि. किसन नजन-पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कुलदीप उर्फ सोनू आढळे याला विसरवाडी जवळून ताब्यात घेतले आहे. तर इतर संशयितांच्या मागावर एलसीबीचे पथक आहे.
रविवारी नेमकं काय घडलं होतं !
शहरातील समता नगरात अरुण सोनवणे हा तरुण वास्तव्यास होता. त्याचे परिसरातील काही तरुणांसोबत गेल्या अनेक दिवसांपासून भांडण सुरु होते. तसेच अरुणच्या भावाचे त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणासोबत वाद झाला होता. त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी अरुण त्याचा चुलत भाऊ आशिष सोनवणेला सोबत घेवून वंजारी टेकडीजवळील नवनाथ मंदिराजवळ गेले. याठिकाणी मारेकऱ्यांसोबत अरुण यांचा शाब्दिक वाद होवून त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी मारेकऱ्यांनी संतापाच्याभरात त्यांच्याजवळ असलेल्या चॉपरसारख्या धारदार शस्त्राने अरुण व आशिष सोनवणे यांच्यावर सपासप वार करीत त्यांना गंभीर जखमी करीत तेथून पसार झाले.
मित्रांसह नातेवाईकांचा आक्रोश !
टोळक्याच्या हल्ल्यात अरुणचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी आक्रोश करीत अरुणला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांसह मित्रांनी संताप व्यक्त करीत प्रचंड आक्रोश केला. जिल्हा रुग्णालयासह समता नगर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी समता नगर परिसरात पोलिस बंदोबस्तासह क्युआरटी पथक तैनात केले आहे.
दोन आठवड्यांवर आले होते लग्न !
अरुण सपकाळे याचे २५ डिसेंबर रोजी लग्न होणार होते. त्यामुळे घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र, त्यापूर्वीच वाद उफाळला व त्याला जीव गमवावा लागला.
भावी पत्नीला अश्रू अनावर !
मयत अरुण सोनवणे याचा दि. २६ नोव्हेंबर रोजी साखरपुडा होवून दि. २५ डिसेंबर रोजी त्याचे लग्न होणार होते. त्याच्या कुटुंबियांसह घरात लग्नाची तयारी सुरु होती. परंतू त्यापुर्वीच त्यांच्यातील जूना वाद उफळून अरुणला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, अरुणचा ज्या तरुणीसोबत विवाह होणार होता. त्याच्या होणाऱ्या पत्नीला घटनेची माहिती मिळाल्यानंतर ती देखील जिल्हा रुग्णालयात आली होती. यावेळी तरुणीने आक्रोश करीत अश्रृंना वाट मोकळी करुन दिली.
संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना !
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह रामानंद नगर व एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेबद्दल माहिती जाणून घेत संशयित मारेकऱ्यांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहे.
भावाला वाचविण्यासाठी गेलेल्यावर हल्ला !
वाद मिटविण्यासाठी अरुण हा वंजारी टेकडीवर गेला असल्याचे कळताच त्याचा मोठा भाऊ गोकुळ हा देखील तेथे पोहचला. यावेळी आपल्या दोघ भावांवर टोळक्याकडून वार होत असल्याचे दिसताच त्याने वार अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावर देखील मारेकऱ्यांनी हल्ला केला. यामध्ये आशिष संजय सोनवणे व गोकुळ बळीराम सोनवणे हे दोघ गंभीर जखमी झाले.
टोळक्याने केले धारदार शस्त्राने वार !
पाच ते सहा जणांकडून धारदार शस्त्राने वार झाल्यामुळे अरुण सोनवणे हा गंभीर जखमी झाला. यावेळी त्याच्या गळा चिरला गेला होता तर डोक्यावर, चेहऱ्यावर आणि पोटावर देखील ठिकठिकाणी भोसकले होते. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अरुणचा मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा व चॉपरचे कव्हर पडलेले होते. पोलिसांनी ते हस्तगत केले आहे.
















