जळगाव (प्रतिनिधी) माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित चाळीसगाव आणि जळगाव पोलीस ठाण्यात दाखल गून्ह्यांशी संबंधित चौकशीसाठी सीबीआयचे दोन अधिकाऱ्यांचे पथक आज जळगावत धडकले. हे पथक साधारण एक आठवडाभर जळगावात थांबणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध बीएचआर प्रकरणात सुनील झवर यांना जामीन मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यात कट रचून खोट्या गुन्ह्यात निलेश भोईटेसह इतरांना अटकवण्याचे षडयंत्र रचल्याचाही गुन्हा दाखल आहे. या दोघ गुन्ह्यांशी संबंधित चौकशीसाठी आज सीबीआयचे पथक जळगावात धडकले होते.
सीबीआयच्या पथकामध्ये पथकामध्ये अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह अन्य एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. तसेच या पथकाने दोघं गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींना चौकशीसह जाब-जबाबसाठी बोलविले असल्याचेही कळते. आज काही जणांची चौकशी केल्याची माहिती देखिल सूत्रांनी दिली आहे. हे पथक आठवडाभर थांबणार असल्याचेही माहितीही सूत्रांनी दिली आहे.
मराठा विद्या प्रसारक संस्था ताब्यात घेण्यासाठी माझा अपहरण करण्यात आल्याची फिर्याद विजय पाटील यांनी दिली होती. त्यात माझ्यासह गिरीशभाऊ महाजन यांचा उल्लेख होता. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस माझ्या घरी झाडाझडती घेत होते, त्यावेळेस विजय पाटील यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी माझ्या घरात काहीतरी वस्तू ठेवल्या होत्या. तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याच मार्गदर्शनाखाली सगळं षड्यंत्र रचले गेले होते. कालांतराने देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला आणि त्यानंतर हे प्रकरण देखील एकमेकांशी जोडलेला असल्याचे समोर आल. त्यानंतर हा गुन्हा शासनाच्या पत्र व्यवहारानंतर सीबीआयकडे वर्ग झाला आणि त्याच अनुषंगाने आज सीबीआयचे पथक जळगावत आले होते. मला देखील त्यांनी बोलावले होते. इतर जाबजबाब आणि चौकशी माझी उद्या होणार आहे. प्रवीण चव्हाण यांनीच गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी षडयंत्र रचलं होतं हे सत्य आहे.
-निलेश भोईटे
मानद सचिव
मराठा विद्या प्रसारक संस्था जळगाव
खंडणी प्रकरणी मुलाने चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. उदय पवार यांच्या माध्यमातून तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी माझ्या मुलाकडून एक कोटी 22 लाखांची खंडणी स्वीकारली होती. बीएचआर प्रकरणात तुझ्या वडिलांना बाहेर येऊ देणार नाही. सुरेश दादांना ज्याप्रकारे पाच वर्षे मध्ये ठेवलं तसं तुझ्या वडिलांना देखील आत ठेवेल, अशी धमकी देत माझ्या मुलाकडून खंडणी उकळली होती. सदर गुन्हा सीबीआयकडे वर्ग झालेला आहे. त्याचा तपास सुरू आहे. सध्या स्थितीत काय स्टेटस आहे?, मला माहित नाही.
-सुनील झंवर
फिर्यादी सूरज झंवर यांचे वडील