जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात जुन्या वादातून एका हॉटेलमध्ये तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. किशोर अशोक सोनवणे (वय ३३, रा. बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
धारदार शस्त्राने केले वार !
किशोर सोनवणे हा रात्री कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानु येथे बुधवारी २२ मे रोजी ९.३० वाजेच्या सुमारास जेवणासाठी गेला होता. त्याच्यावर पाळत ठेवत इतर तरुणांना संशयित आरोपींनी बोलावून घेतले. हॉटेलमध्ये किशोर सोनवणे याच्यावर रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटस्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, इतर मारेकरी फरार झाले आहेत.
खुनाचा संपूर्ण थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !
खुनाचा संपूर्ण थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मृतदेह जीएमसीत हलवल्यानंतर नातेवाइकांसह मृताच्या मित्रांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे रात्री ११.३० ते १.२५ वाजेपर्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.