जळगाव (प्रतिनधी) जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयात घुसून मारहाण, कागदपत्रे चोरीप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच याच प्रकरणाशी निगडीत खाडाखोड व बनावट दस्तऐवजांच्या आधारे काही आदेश काढले. त्याचप्रमाणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव विनोद प्रभाकर पाटील व पोलिसांवर दबाब आणून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत या शैक्षणिक संस्थेच्या ताब्यावरून ॲड. विजय भास्कर पाटील व नीलेश रणजित भोईटे अशा दोन गटांमध्ये वाद आहे. यात संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांनी दि. १५ डिसेंबर रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये त्यांनी संस्थेच्या विद्यामान कार्यकारीणी व पदाधिकारी यांच्या जागी ॲड. विजय पाटील, संजय पाटील यांच्याकडून त्यांच्या गटातील व मर्जीतील मंडळींची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
या करीता ॲड. विजय पाटील व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दि. १९ जुलै २०२१ रोजी या संस्थेच्या जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या परिसरातील संस्थेच्या कार्यालयात शिरून प्राचार्य, कर्मचारी, शिक्षकांना शिवीगाळ व दमदाटी, मारहाण केली. तसेच कार्यालयातून महत्त्वाची दस्तऐवज व रजिस्टर चोरून नेले.
या प्रकरणी प्राचार्य, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारही दिली होती. सीबीआय चौकशीत ॲड. विजय पाटील यांच्यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यांनी जळगावच्या तत्कालीन पोलिस अधीक्षकांवर दबाव आणल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जळगावातील या शैक्षणिक संस्थेतील दि.१९ जुलै २०२१ रोजीची घटना ही मोठ्या कटकारस्थानाचा व षडयंत्राचा भाग असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. ॲड. विजय पाटील यांनी तयार केलेली खोटी कागदपत्रे नंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सादर करुन त्यांचा वापर केला.
विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील यांना या सर्व खाडाखोडीची व बनावट दस्तऐवजांची पूर्ण कल्पना असूनही ते स्वत: या कटात सहभागी झाले. तसेच त्यांनी या कागदपत्रांच्या आधारे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होणारे काही आदेश काढले. त्याचप्रमाणे गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्यासाठी हे कटकारस्थान रचण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. नीलेश भोईटे यांच्या या फिर्यादीवरून ॲड. विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, विनोद प्रभाकर पाटील, ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.