जळगाव (प्रतिनिधी) राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील आकाशवाणी चौक,ईच्छा देवी चौक,अजिंठा चौफुली, या तिन्ही ठिकाणी उड्डाणपूल करणे,शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करणे,पाळधी ते तरसोद वळण रस्ता त्वरित करणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरातर्फे दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता जळगाव जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण जागर यात्रेदरम्यान सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्ग या रस्त्याबाबत सविस्तर माहिती दिली त्याच प्रकारे उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा रस्त्यांची परिस्थिती अशीच बिकट आहे याबाबत सरकारला जाब विचारला आहे. अमित ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गावर कोकण जागर यात्रा करून रस्त्याची वास्तव परिस्थिती दाखवली आहे.
जळगाव शहरात सुद्धा महामार्ग असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडत आहेत. शहरात उड्डाणपूल मंजूर झाले असून ते अजूनही होत नाही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याकरता जळगाव जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव जागर यात्रा शिव कॉलनी स्टॉप ते अजंठा चौफुली असा प्रवास करणार आहे.जळगाव जागर यात्रेत मनसेचे जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका सचिव, शहर अध्यक्ष, शहर अध्यक्ष, महिला आघाडी, जिल्ह्यातील सर्व अंगिकृत संघटना पदाधिकारी, विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. जागृत जळगावकर नागरिकानी सुद्धा जळगाव जागर यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन जळगाव शहर मनसेतर्फे करण्यात आले आहे.