जळगाव (प्रतिनिधी) तिसऱ्या मजल्यावर साफसफाई करतांना तोल जावून खाली कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मनिषा श्यामकांत बाविस्कर (क्य ३०, रा. श्रीरत्न कॉलनी) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास पिंप्राळा परिसरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनीत मनिषा बाविस्कर या कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्या एस.टी. वर्कशॉपमध्ये नोकरीला होत्या. शनिवारी त्यांना सुट्टी असल्याने त्यांच्या घरातील तिसऱ्या मजल्यावर त्या काम करीत होत्या. सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील खिडकीची काच पुसत असतांना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.
याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबीयांनी मनहेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, उंदराला गॅलरीच्या स्लायडिंग विंडोतून घराबाहेर काढण्यासाठी झोक्यावर चढल्यानंतर तोल गेल्याची माहिती देखील समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे व दोन मुले असा परिवार आहे. मनीषा बाविस्कर यांचे पती श्यामकांत हे सैन्यदलात जवान असून त्रिपुरा येथे देशसेवा करत आहेत.