यावल (प्रतिनिधी) शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या बिअर शॉपीमध्ये बिअर घेताना पाचशेची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रकार व्यावसायीकाच्या सतर्कतेने उघड झाला होता. पोलिसांनी पोलिसांना तीन जणांना पकडले मात्र एक साथीदार पसार झाल्याने त्यासदेखील ध्यप्रदेशातील बर्हाणपूर शहरातून पोलिसांनी अटक केली. चौघांना शुक्रवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुणावण्यात आली.
रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता
यावल शहरातील भुसावळ रस्त्यावरील व्यापारी संकुलातील बिअर शॉपीत बुधवारी सायंकाळी चार जण बिअर घेण्यासाठी आले. त्यांनी 500 रुपयांची नोट दिली मात्र दुकानदाराला नोट बनावट असल्याचा संशय येताच त्याने पोलिसांना माहिती दिली. यानंतर उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार अस्लम खान, हवालदार अर्षद गवळी, न्याजोद्दीन तडवी, वासुदेव मराठे यांचे पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी श्रावण गंभीर महाजन (वय 54, रा. रेंभोटा ता.रावेर), राजेंद्र मुरलीधर पाटील (43, रा.अयोध्या नगर, जळगाव), नीलेश सुरेश पाटील (33, रा.डोणगाव ता.धरणगाव) या तिघांना ताब्यात घेतले तर एक संशयीत पसार झाला होता. चौकशीत या तिघांकडून 97 हजार रुपयांच्या एकूण 194 नोटा जप्त करण्यात आले.
पसार आरोपीला बर्हाणपूरात बेड्या
पसार झालेला चौथा संशयीत सुनील सुरेश अत्तरे (26, रा.बोरगाव बुजुर्ग, ता.पंधान, जि.खरगोन) यालादेखील गुरूवारी मध्यरात्रीनंतर मध्य प्रदेशातील बर्हाणपूर शहरातून ताब्यात घेण्यात आले व अटक करण्यात आलेल्या या चौघांना यावल न्यायालयात न्या.आर.एस.जगताप यांच्या समोर हजर केले असता त्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे.