जळगाव (प्रतिनिधी) दूध संघातून २६ टन दूध पावडरने भरलेला ट्रक लखनऊकडे रवाना झाला. मात्र, ट्रक मालकासह चालकाने या ७५ लाख ४५ हजार रुपये किंमतीची २६ टन दूध पावडरची परस्पर विल्हेवाट लावून अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ट्रक मालक रुस्तम कमलेश बघेल (रा. छत्रपुर, जांगीपुर, पिचोरा डावरा, ग्वालिअर मध्यप्रदेश) याच्यासह चालक फिरोज सरजूद्दीन (रा. शिवनगर, राधेवाली गल्ली, आग्रा, उत्तरप्रदेश) या दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अपहराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहरुण परिसरातील रामदास मोहन थोरवे (वय ४७) यांचा गणेश लॅजेस्टीक नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. दि. ५ जून रोजी त्यांना राजस्थानमधील विरल मिल्क अॅण्ड अॅगो इंडस्टीजचे वनोट सोनी यांनी फोन करुन विकास दूध फेडरेशन येथून त्यांनी २६ टन दूध पावडर खरेदी केली आहे. ती दूध पावडर लखनऊ येथील एमआयडीसी परिसरातील मेसर्स सी. पी. मिल्क अॅण्ड फूड प्रोडक्ट प्रा. लि. या कंपनीत पोहचवण्यास सांगितले. परंतु थोरवे यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये वाहन उपलब्ध होत नसल्याने त्यांनी ट्रान्सपोर्ट दलाल उल्हास जुंजाळकर यांना २६ टनी ट्रक लखनऊसाठी पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानुसार जुंजाळकर यांनी सुपर मेवात ट्रान्सपोर्टचे मालक किशोर पाटील रा. गणेशवाडी यांना थोरवे यांच्यासोबत संपर्क करण्यास सांगितला. किशोर पाटील यांनी (आरजे ११, जीबी ९५७९) क्रमांकाचा ट्रक उपलब्ध असल्याचे सांगितल्याने थोरवे यांनी याबाबतची माहिती विरल मिल्कचे मालक सोनी यांना दिली. त्यानंतर दि. ५ जून रोजी दूध पावडर ट्रकमध्ये लोड केल्यानंतर ट्रक लखनऊकडे रवाना झाला.
थोरवे यांनी संबंधितांची चौकशी केली असता, दि. ७ जून रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास दध पावडर घेवन निघालेल्या ट्रकने पुरनखेडी, शिवपुरी मध्यप्रदेशातील टोलनाका पार केल्याचे त्यांना समले. परंतु दूध पावडर अद्याप देखील पोहचली नसल्याने ट्रक मालक व चालकाने त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी ७५ लाख रुपयांच्या २६ टन दूध पावडरचा अपहार केला असून त्यांच्याविरुद्ध रामदास थोरवे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दूध पावडरचा माल घेवून ट्रक लखनऊकडे जात असतांना दि. ७ जून रोजी रात्री ९ वाजेपर्यंत ट्रक मालक रुस्तम व चालक फिरोज यांच्यासोबत थोरवे यांचा संपर्क सुरु होता. मात्र त्यानंतर नंतर त्यांचा फोन बंद येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळपासून चालक व मालकासोबत संपर्क होत नसल्याने थोरवे यांनी सोनीमार्फत लखनऊ येथील कंपनीत संपर्क साधला. परंतु दूध पावडरचा माल अद्याप देखील त्याठिकाणी पोहचला नसल्याने त्यांनी सांगितले.