जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वाढणारे ग्रीन स्पेस, नवीन तयार झालेल्या रस्त्यांमुळे हवेतील प्रदुषण कमी झाल्यामुळे जळगाव शहर राज्यात चौर्थ्यां क्रमांकावर आल्याची माहिती महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रकाश पाटील यांनी दिली. शुध्द हवा सर्वेक्षण स्पर्धेत जळगाव शहराला राज्यात चौथा क्रमांक व देशात २० वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे सहा महिन्यापुर्वी शुध्द हवा सर्वेक्षण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातील ३ ते १० लाख लोकसंख्येच्या ४३ शहरांमध्ये जळगाव शहर २० व्या स्थानी आहे तर, राज्यात चौथा क्रमांक जळगावचा आला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी देशातील १३१ शहरांमध्ये ‘शुध्द हवा सर्वेक्षण’ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अमरावती देशात दुसऱ्या क्रमांकावर आले असून नवी मुंबई ५ व्या क्रमांकावर तर उल्हासनगर १३ क्रमांकावर आहे. तसेच जळगाव देशात २० व्या क्रमांकावर आहे. तसेच राज्यातून निवड झालेल्या पाच शहरांपैकी अमरावतील प्रथम, नवी मुंबई द्वितीय, उल्हासनगर तृतीय व जळगाव चतुर्थ क्रमांकावर आहे. या स्पर्धेत अमरावतीला १९५, नवी मुंबईला १९०.५ गुण, उल्हास नगर शहराला १८२.५ गुण तर, जळगाव शहराला १७१.९ गुण मिळाले आहेत.
शहरात बहुतेक रस्त्यांची दुरावस्था झाली होती. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रस्त्यांवरून धुळ उडत असल्यामुळे वायु प्रदूषणाचा स्तर वाढला होता. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये जळगाव शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत त्यापैकी २३० रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत. यामुळे धुळीचे प्रमाण कमी झाले असून त्याचा फायदा शुध्द हवा सर्वेक्षणात झाला आहे. तसेच शहरातील वृक्ष लागवड व ग्रीन स्पेस वाढत असल्यामुळे देखील धुळ धुळ कमी झाली असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.