जळगाव (प्रतिनिधी) कौटुंबिक संबंध असल्याचा गैरफायदा घेत एका नराधमाने जेवणाचा डबा घेण्याच्या निमित्ताने चाकूच्या धाकावर २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. विनोद सुकलाल भोळे (रा.सदोबा नगर, जळगाव) असे नराधमाचे नाव असून त्याच्याविरुद्ध शनी पेठ पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात अधिक असे की, पीडित तरुणीच्या आईचे पंधरा दिवसापूर्वीच आजारपणामुळे निधन झाले आहे. तर वडील एका ठिकाणी कामाला आहेत. १ सप्टेबर रोजी वडिलांची रात्रपाळी ड्युटी असल्याने ते कामावर गेले होते. त्यामुळे पीडिता एकटीच घरी होती. पिडीत तरुणीच्या परिवारासोबत विनोद भोळे याचे घरोब्याचे संबंध होते. त्यामुळे त्याचं येणंजाणं सुरु होते. या काळात त्याची पत्नी व दोन मुलं गावाला गेलेले होते. त्यामुळे पीडितेकडून त्याला जेवणाचा डबा मिळत होता. १ सप्टेबर रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान भोळे हा पीडितेच्या घरी गेला. घरात आल्यावर त्याने चाकूचा धाक दाखवून पिडीतेला घरामागे नाल्याजवळ नेले. परंतू तेथे अंधार असल्याने तेथून तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. घरी त्याने पीडितेवर दोन वेळेस अत्याचार केला. यावेळी त्याने डाव्या हातावर चाकू मारल्याने दुखापत झाली. एवढेच नव्हे तर पिडीतेच्या मोबाईल फोडून झालेला प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एक तासाने तरुणीची सुटका केली. पिडीत तरुणीने मंगळवारी शनी पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार भोळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण हे करीत आहेत.
















