जळगाव (प्रतिनिधी) घरात कोणी नसल्याची संधी साधत २६ हजार रुपये चोरताना सोनी हनुमान पवार (२४, रा. शिवशक्ती नगर) या मोलकरणीला घरमालक महिलेने रंगेहाथ पकडले. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी मोलकरणीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर परिसरात ॲड. अंजली भुसारी यांचे निवासस्थान असून २३ रोजी त्यांचे पती ॲड. केदार भुसारी हे मालेगाव येथे गेले होते. त्या वेळी ॲड. अंजली व त्यांच्याकडे काम करणारी सोनी पवार या घरी होत्या. काही कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या ॲड. अंजली घरात परत आल्या तर मोलकरणीने कपाटातून २६ हजार रुपये काढून व कपाट पुन्हा लावत असल्याचे दिसले. तिला रंगेहाथ पकडून शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्या वेळी पोलिस तेथे पोहचले व मोलकरणीला ताब्यात घेतले.
चोरीच्या या घटनेच्या एक दिवस अगोदरच ॲड. केदार भुसारी यांनी पत्नीकडे ५७ हजार रुपये दिले होते. चोरी करताना मोलकरणीने संशय येऊ नये म्हणून त्यातून केवळ २६ हजार रुपयेच काढले व उर्वरित रक्कम कपाटातच राहू दिली. मात्र त्या वेळी ती रंगेहाथ पकडल्या गेली. या प्रकरणी ॲड. अंजली भुसारी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोनी पवार हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीश पाटील करीत आहेत.